उडाली पाखरे परदेशी ,मोकळा चौसोपी वाडा.
पोपडे पडे ओसरीस ,नाही अंगणी शेणसडा..
ना सकाळची लगबग, ना गोडआवाज जोडव्याचे
चुल शांत,.वाळले पोतेरे,लुप्तले नाद बांगड्याचे
परसदारी तो औदुंबर, असे शांतपणे उभा.
ना त्यास प्रदक्षिणा, ना कुणी राखे निगा.
कोनाड्यातील आरसा ,उडाला त्याचा हि पारा
भीतीवरील कुंकु खुणा, मिरवी सौभाग्याचा तोरा
अडगळीतली रेशमी वसने, सांगे शृंगाराच्या कथा
कोप~यातली उभी काठी, कण्हे वार्धक्याच्या व्यथा.
कोप~यातल्या खाटेवर, श्वास मंदसा घुमे कुणाचा?
ना हाती जीवनमरण ,भोग भोगणे खेळ नियतींचा
No comments:
Post a Comment